लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण व मदत पुनर्वसन शाखेच्या कार्यालयात हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत आहे. नागरिकांना प्रत्यक्ष येऊनही इथे आपल्या अडचणी मांडता येतात, तसेच २४ तास सुरू राहणारा कंट्रोल रूमचा (०२४१) २३२२४३२ हा मोबाइल क्रमांक जाहीर केला आहे. या कंट्रोल रूमसाठी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, तसेच अन्न व औषध प्रशासनाने सहायक आयुक्त कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन दिवसांपासून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
दररोज किमान शंभरच्या वर नागरिक या कक्षाला भेट देऊन रेमडेसिविर आणि ऑक्सिजन बेडची चौकशी करीत आहेत. संबंधित रुग्णाचे केवळ नाव लिहून घेतले जाते. त्यामुळे संबंधित रुग्णाची समस्या सुटली की नाही, याची मात्र कोणालाही जबाबदारी दिली नसल्याने या कक्षाबाबत नागरिकांनी प्रशासन आणि माध्यमांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये बाराशेच्या वर रुग्णांच्या नातेवाइकांनी आपल्या अडचणी कक्षात फोनवरून, तसेच प्रत्यक्ष भेटून सांगितल्या आहेत.
---------
कोणाला हवे ऑक्सिजन, कोणाला हवे रेमडेसिविर
नियंत्रण कक्षात कोणाला ऑक्सिजन बेड हवा असतो, तर कोणाला रेमडेसिविर इंजेक्शन हवे असते. बेड कुठे मिळेल, रेमडेसिविर कुठे मिळेल. याची चौकशी केली जाते. मात्र, योग्य उत्तर न मिळाल्याने इथे वाद होत आहेत. दरम्यान, रुग्णांच्या नातेवाइकांची व ते दाखल असलेल्या रुग्णालयाचे नाव नोंदवून घेतले जाते. यापलीकडे कोणतीही सुविधा मिळत नसल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
------------
सात ते आठ कर्मचारी
आपत्ती व्यवस्थापन विभागातील एक अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागातील एक अधिकारी, नोडल अधिकारी, त्यांना साहाय्य करणारे चार कर्मचारी या विभागात आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या अधिपत्याखाली या कक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. एक कर्मचारी टप्प्याटप्प्याने दूरध्वनीवर संपर्क साधण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे.
----------
जिल्ह्यात सध्या रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. याबाबत रुग्णांच्या सर्वाधिक अडचणी असून, त्या अडचणी सोडविण्यासाठी २४ बाय ७ हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी आपले म्हणणे योग्य पद्धतीने सांगावे, त्याची नोंद करून त्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
-संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी
-------------------
एक रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी शहरातील दवाखाने, औषधांची दुकाने हिंडलो. मात्र, कुठेच मिळाले नाही. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन नोंदणी केली. मात्र, दोन दिवस झाले तरी त्यावर कार्यवाही झालेली दिसली नाही. केवळ रुग्णाचे नाव नोंदणी करण्याबरोबरच नातेवाइकांचा संपर्क क्रमांक, हॉस्पिटलचे नाव, अशी परिपूर्ण नोंदणी केली तरच त्याचा उपयोग होईल.
-किरण काळे, रुग्णाचे नातेवाईक
--------------
जिल्ह्यात एकही बेड शिल्लक नाही. त्यात कसाबसा एका खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला; पण तिथे ऑक्सिजन मिळालेला नाही. आता जिल्हाधिकारी साहेब तरी ऑक्सिजन देतील, अशी आशा आहे. मात्र, इथे आपत्ती निवारण केंद्रामध्ये दोन तास झाले तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोणीच दखल घेतलेली नाही.
-एक महिला, भिंगार
------------
नेट फोटो -डमी
व्हॅक्सिन
१७ वॉर रूम डमी
वॉर रूम
--
फोटो- १८ कलेक्टर ऑफिस