नेवासा : काही लोक आपल्या संघटनेत होते. काहीतरी गफलत झाल्यामुळे मध्यंतरीच्या काळात ते आपल्यापासून दुरावले होते. मात्र, कालांतराने अविचारी लोकांच्या पाठीमागे राहण्यात अर्थ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणात विचार बदलणारा माणूस कोणाच्याच विश्वासाला पात्र नसतो. अशांच्या बरोबर जाण्यात अर्थ नसल्याचे त्यांना समजून चुकले आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांचा नामोल्लेख टाळून केली.
जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झालेले मृद जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, तसेच ज्ञानेश्वर, मुळा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष-उपाध्यक्ष, संचालकपदी निवड झालेल्यांचा नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ‘मुळा’चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, ज्येष्ठ संचालक ॲड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, बबनराव भुसारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, सभापती रावसाहेब कांगुणे, जिल्हा बँकेचे उमेदवार प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भाऊसाहेब मोटे, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, ज्ञानदेव वाफारे यांच्यासह मुळा-ज्ञानेश्वर कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.
शंकरराव गडाख म्हणाले, देवीचे वरदान लाभलेला हा जायकवाडी बॅक वॉटरचा पट्टा आहे. मात्र, या वरदान लाभलेल्या पट्ट्यातही मोठे प्रश्न आहेत. स्व. घुले पाटील व ज्येष्ठ नेते गडाख यांनी हे प्रश्न हेरून त्यावर प्रामाणिकपणे काम केल्यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. त्यासाठी तुमचे कष्ट व परिश्रम आहेत. त्याला बळ देण्याचे काम घुले-गडाख या नेत्यांनी प्रामाणिकपणे केले आहे.
---
उद्धव ठाकरे सत्शील मुख्ममंत्री...
उद्धव ठाकरे यांच्यासारखे एक सत्शील व सरळमार्गी व्यक्तिमत्त्व असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्य आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काढले.
फोटो : १४ नेवासा गडाख
गिडेगाव येथील कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख. यावेळी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले व इतर.