नेवासा : कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय करणार नाही. पोलीस प्रशासनास सहकार्य करून शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन नव्याने रूजू झालेले सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे यांनी केले.
मुळाथडी परिसरातील खेडले परमानंद, शिरेगाव, पानेगाव, करजगाव, अंमळनेर आदी गावांतील शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन पानेगाव (ता. नेवासा) येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पानेगावचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले हे होते.
कर्पे म्हणाले, नियमांचे पालन हे आपल्यासाठीच आहे. जातीय सलोखा राखून गाव हे एका कुटुंबाप्रमाणे समजावे व गुण्यागोविंदाने एकत्र राहून नवा आदर्श निर्माण करावा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून कोणाला त्रास होत असेल तर तातडीने मला संपर्क करा. अशा लोकांचा तातडीने बंदोबस्त केला जाईल, असे आवाहनही त्यांनी केले. सोनई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गावांत गाव तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याच्या दृष्टीने शांतता समितीच्या बैठकीत हा विषय घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पानेगाव संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव गागरे, जालिंदर जंगले, दत्तात्रय घोलप, दशरथ जंगले, गोरक्षनाथ जंगले, बबन जंगले, बापूसाहेब जंगले, शामराव जंगले, बाळासाहेब काकडे, संदीप जंगले, सुदाम जंगले, कैलास घुनावंत, संपत जंगले, बाबासाहेब शेंडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब नवगिरे यांनी केले. पोलीस पाटील बाबासाहेब जंगले यांनी आभार मानले.