खर्डा : जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एकाच रात्री चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. काही ठिकाणी घरफोडी झाली तर काही ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला. हा प्रकार आठ ठिकाणी घडला.
येथील बालाजी अंकुश सहा हजार रोख, भरत ऐडबा गायकवाड दोन पितळी घागर, बाजीराव किसन गायकवाड दोन चांदीचे जोडवे, मनोहर नरशिंग गायकवाड मोबाइल, जर्किंग तसेच ईश्वर आमरुळे, शहादेव काळे, भागवत मनोहर गायकवाड, संतोष सोपान भोसले यांचे घर उघडून चोरीचा प्रयत्न शनिवारी रात्री घडला.
तसेच दोन दिवसांपूर्वी दत्ता पाटील यांच्या घरातून दीड हजार रुपये, आधार कार्ड, गणेश पोपट गायकवाड यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु आतून लॉक असल्यामुळे चोरांचा प्रयत्न असफल झाला. काहींच्या घरातील साहित्याची उचकापाचक करून कपडे अस्ताव्यस्त फेकून दिले. काही घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीचा प्रयत्न असफल ठरला.
चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच खर्डा चौकीचे पोलीस नाईक संभाजी शेंडे, हेड कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के, संग्राम जाधव, आबा अवारे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती. जातेगाव परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रकारांत वाढ झाली आहे.