दहिगावने : आमदार मोनिका राजळे यांनी पहिल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या टर्ममध्ये भावीनिमगावात एकही विकासकाम केले नाही. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही आतापर्यंतच्या दोन वर्षात एकही विकासकाम केलेले नाही, असा आरोप भावीनिमगावचे (ता. शेवगाव) सरपंच आबासाहेब काळे यांनी केला आहे.
काळे म्हणाले, भावीनिमगावातील अनेक प्रलंबित कामांसाठी ग्रामस्थांनी आमदार राजळेंकडे वारंवार मागणी केली. आमची ग्रामपंचायत जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीची असली तरी जी कामे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होऊ शकत नाहीत, अशा कोणत्याही कामात ग्रामपंचायतीच्या वतीने आडकाठी निर्माण केली गेली नाही. मात्र तरीही राजळेंनी विकासकामे दिली नाहीत. असे असताना त्या तालुक्यात प्रचंड विकासकामे केल्याची बतावणी करत आहेत. मात्र भावीनिमगावसारखी अनेक गावे असतील जिथे राजळेंनी दमडीचेही विकासकाम केलेले नाही. यातच भर म्हणजे ऊसतोडणी हंगाम सुरू असताना इकडील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उसाच्या नोंदी वृद्धेश्वर कारखान्याला दिलेल्या होत्या. मात्र ऐनवेळी त्या कार्यकर्त्यांनाही राजळेंनी वाऱ्यावर सोडले. अशावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले.