पोहेगाव दूरक्षेत्रास किमान कर्मचाऱ्यांची नेमणूक होऊन दूरक्षेत्र नियमित सुरू ठेवण्याबाबत पोहेगाव ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार केला होता. त्यावर पोलीस अधीक्षकांनी पोहेगाव दूरक्षेत्र बंद असल्याची गंभीर दखल घेत १५ मार्च रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला आदेश काढत पोहेगाव दूरक्षेत्र पोलीस आउटपोस्टला कर्मचाऱ्यांची नेमणूक करून सुरू ठेवण्यासंबंधीचे पत्र पाठवले होते; मात्र शिर्डी पोलीस स्टेशनने या पत्राकडे दुर्लक्ष करत त्या पत्राला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसते आहे. सुरुवातीला काही वर्षे शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्राचे दैनंदिन काम चालू झाले असता, घरफोड्या व अवैध धंद्यांना आळा बसला; मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून शिर्डी पोलीस स्टेशनने अपुरे कर्मचारी संख्येचे कारण देऊन आऊट पोस्ट बंद ठेवण्यात आले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून पोहेगाव येथील पोलीस दूरक्षेत्र कुलूपबंद अवस्थेत आहे. या क्षेत्राच्या अंतर्गत परिसरातील १० ते १२ गावांचा समावेश असून, शिर्डी पोलीस स्टेशन कुठल्याही कर्मचाऱ्यांची नेमणूक करत नाही. त्यामुळे पोहेगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने खुलेआम बेकायदा दारूविक्री, मटका जुगार पाकीटमारी, भुरट्या चोऱ्या सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. शनिवारी गावातील एटीएम चोरट्यांनी फोडून ५ लाख ७९ हजार रुपये चोरून नेले. हाकेच्या अंतरावर असलेले आऊट पोस्ट चालू असते तर या घटना घडल्या नसत्या. सरपंच अमोल औताडे यांनी ग्रामसभा घेत सर्व निवेदने पोलीस अधीक्षकांना पाठवली; परंतु अजूनही येथे कर्मचारी दाखल झालेले नाहीत.
पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र बंद असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST