शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या कुरकुंडी हद्दीतील खंडोबाचे माळाच्या पूर्व बाजूने या डोंगराला आग लागली. डोंगराला आग लागल्याची माहिती समजताच वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांसह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोंगरावर वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. खंडोबाचे माळ येथून सुरू झालेली आग कुरकुंडी गावच्या बाजूला असलेल्या डेरा डोंगराकडे सरकत गेली. या आगीत अनेक झाडेझुडपे व वनसंपदा जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. या वन क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या विक्रम घोलप यांच्या डाळिंबाच्या बागेचेही आगीत नुकसान झाले.
दरम्यान , शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, कुरकुंडीच्या सरपंच शाहीन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप आहेर, पप्पू चौगुले, भानुदास पवार, अमीर शेख, भरत वायळ, अरुण गायकर, भानुदास पवार, अभिषेक माळी, अमोल कर्डक, संतोष जाधव, गणेश टोकरे, दत्तात्रय माळी, अक्षय पवार आदी युवकांनी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
............
०५ आग - डोंगराला लागलेली आग विजविताना कुरकुंडी येथील युवक