लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. या पर्यायामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्यास किंवा त्याच्याशी पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानांत धान्य घेत आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील १० हजार २३० कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात. काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘वन रेशन-वन नेशन’ या योजनेंतर्गत या पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध झाल्याने रेशनकार्डधारक देशातील कोणत्याही रेशन दुकानावरून धान्य घेऊ शकतो. जिल्ह्यातील १० हजार २३० कार्डधारकांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे. म्हणजे या कार्डधारकांनी दुकानदारच बदलून टाकला आहे. तालुक्याच्या बाहेर जाऊन धान्य घेतले आहे.
-------------
नेवासा तालुक्यात सर्वाधिक बदल
नेवासा तालुक्यात सर्वाधिक १६५२ कार्डधारकांनी दुकान बदलून धान्य घेतले आहे. त्याखालोखाल राहुरी व नगर शहरातील १२२७ कार्डधारक, तर श्रीरामपूर तालुक्यातील ११३३ कार्डधारकांनी दुकान बदलून धान्य घेतले आहे. पूर्वी कार्डधारक ज्या भागात राहतो, त्याच भागातील दुकानातून धान्य घेतले जायचे. मात्र, या पोर्टेबिलिटीचा पर्याय कार्डधारकांना चांगलाच आवडला असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी राहत आहेत. अशा सर्वाधिक नागरिकांनी दुकानदार बदलून या पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
---------------
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
आधी राज्य सरकारने दिवाळीपर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारनेही तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्यामुळे रेशनकार्डधारकांना दुप्पट धान्य मिळणार आहे. नगर जिल्ह्यासाठी एका महिन्यात ३१ लाख ४६ हजार ९३ इतक्या लाभार्थ्यांसाठी १५ हजार ७३० मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. एका लाभार्थ्याला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ, असे पाच किलो धान्य एका महिन्यासाठी मिळते. ते आता मोफत योजनेंतर्गत दुप्पट मिळणार आहे.
-----------------
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक- १०,८८,३८५
जणांनी दुकानदार बदलला-१०,२३०
-------------
बीपीएल-६,०५,५२४
अंत्योदय-८८,६१८
केशरी-३,३५,६६०
-----------------
कोणत्या तालुक्यात किती जणांनी दुकानदार बदलला
अहमदनगर ग्रामीण-२५३
पाथर्डी-३९९
शेवगाव-२७४
पारनेर-७२०
कर्जत-७२०
जामखेड-४८८
श्रीगोंदा-१८२
संगमनेर-६९०
कोपरगाव-४६३
अकोले-८७३
श्रीरामपूर-११३३
नेवासा-१६५२
राहाता-४५२
राहुरी-१२२७
नगर शहर-१२२७
----------
एकूण