मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक लक्षवेधी कार्य करणारे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या चांगल्या कामाची हातोटी पाहून जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार दिला होता. त्याच पुरस्कराला अभिप्रेत राहून तहसीलदार शेख यांनी पुन्हा एकदा कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. राहुरी परिसरात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याची पाहणी करण्यासाठी नुकतेच तहसीलदार शेख यांच्यासह पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, नायब तहसीलदार गणेश तळेकर, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ६०० बेड क्षमतेचे कोविड उपचार केंद्र कार्यान्वित आहे. तेथील रुग्णांची अन्न, पाण्याची सोय करणे, विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून उपयुक्त नियोजन सुरूच आहे, तसेच शहरातील डॉ. विक्रम खुरूद, डॉ. प्रवीण कोरडे, डॉ. कुलकर्णी यांच्या खाजगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरू असताना तेथेही शासकीय ऑडिटरची नेमणूक आहे. देवळाली प्रवरा येथे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कोविड सेंटरमध्येही रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत.