श्रीगोंदा : अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख आळेकर यांनी ‘गो ग्रीन प्रोजेक्ट’ गावागावांत राबविण्यासाठी सायकलवर जाऊन वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आढळगावपासून करण्यात आला.
अस्तित्व फाउंडेशनच्या सदस्यांनी आढळगावनंतर शेडगावला सायकलवर जाऊन वृक्षारोपण केले. शेडगावचे माजी सरपंच विजय शेंडे यांनी स्वागत केले. वृक्षलागवडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. विजय शेंडे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेडगावमध्ये ७ हजार ५०० झाडे लावण्यात आली. अस्तित्व फाउंडेशनच्या सदस्यांनी गावे वसुंधरेने नटण्यासाठी चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यामधून सायकल चालविण्याची गोडी निर्माण होणार आहे.
गोरख आळेकर म्हणाले, मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करावे. आठवण म्हणून त्याचे संगोपन मुलीच्या आई-वडिलांनी करावे. विलास तरटे, चंद्रकांत मेहेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. ओमकार आळेकर यांनी आभार मानले.
प्रा. संजय आळेकर, कुणाल लांडे, अनिकेत लांडे, तुषार आळेकर, पोपट आळेकर,
स्वरूप आळेकर, विशाल पांढरकर, सूरज कांबळे, यश घायाळ, निखिल घोडके, तेजस आनंदकर, ओम कोकणे, सौरभ आनंदकर,
जुबेर बागवान आदींची उपस्थिती होती.