अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रातून होत असलेल्या वाळू उपशाबाबत तपासणी करण्यासाठी तलाठी स्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये पाच महसूल कर्मचारी असतील. हे पथक गोदावरी पात्रातील वाळू उपशाबाबत पडताळणी करेल. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गोदावरी नदीपात्रातील वाळू उपशामुळे श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ माजला आहे. चार दिवसांपूर्वी मातुलठाण येथील वाळू तस्करांवर पोलिसांना छापा टाकला. येथील अवैध वाळू उपशाबाबत ‘लोकमत’मधून गेल्या तीन दिवसांपासून वृत्त प्रसिद्ध होत आहे. मात्र, त्याची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली गेली नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाने अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही.
मातुलठाण येथील वाळू उपशाबाबत स्वत: जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही चुप्पी साधली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने ही या उपशाकडे कानाडोळा केला आहे. मातुलठाण येथील उपशाबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, अशाच आविर्भावात गौण खनिज विभाग आहे. स्थानिक तलाठी, मंडल अधिकारी काय देखरेख करतात, ते वरिष्ठांना अहवाल पाठवितात की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी मातुलठाण येथे जो छापा टाकला तो शासकीय लिलाव झालेल्या ठिकाणी टाकला की अन्य ठिकाणी हा संभ्रम कायम आहे. हा छापा शासकीय लिलावाच्या ठिकाणी असेल तर यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा कसा केला जात होता व या ठेक्यावर महसूल प्रशासन कारवाई का करत नाही? असा प्रश्न निर्माण होतो. वाळूचा जो अधिकृत ठेका आहे तेथे यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करता येत नाही. मग ही यंत्रसामग्री आली कशी? महसूल विभाग अजून तरी याबाबत काहीही खुलासा व चौकशी करायला तयार नाही.
-------------------
श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळू उपशाबाबत तपासणी करण्यासाठी तलाठी स्तरावर महसूल कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले आहे. ते सलग चार-पाच दिवस वाळू घाटांची प्रत्यक्ष तपासणी करेल. नेमका वाळू उपसा कोठून होतो, हा उपसा कोण करत आहेत? लिलाव झालेल्या पात्रातून उपसा होतो की अन्य ठिकाणाहून याबाबत हे पथक पडताळणी करणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल.
-अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर
.......................
विखे मातुलठाणला जाणार का?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात आक्रमक आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनीही वाळू उपशाबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेवर टीका केली. ‘महसूलमंत्री वाळू उपशाबाबत काहीच बोलत नाहीत’ असे विखे म्हणाले. थोरात मौन धारण करुन असल्याने विखे स्वत: मातुलठाणला वाळू उपशाची पाहणी करण्यासाठी जाणार का? तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार का? असा प्रश्न आहे. भाजपचे नेतेही वाळू उपशाबाबत आक्रमक भूमिका न घेता केवळ टीकाटिपण्णी करताना दिसत आहेत.
..............
बाळासाहेब थोरात यांचे मौनच
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची वाळू उपशाबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, थोरात यांचेकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. काही नेत्यांचे नातेवाईकच वाळू ठेक्यात उतरले असून प्रशासनही या सर्व बाबींचा ‘अर्थपूर्ण’ फायदा घेत असल्याची चर्चा आहे. वाळू उपशातून काही गंभीर घटना घडल्यास ठेकेदार व अधिकाऱ्यांची छुपी युतीच त्यास कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.
...........
आंतरजिल्ह्याचे गुन्हेगारी जाळे
वाळू तस्करांमध्ये अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात जाळे तयार झाले आहे. अनेकदा मात्तबर मंडळी अन्य नावाने ठेके घेतात. श्रीरामपूर येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत नाशिकचे व परप्रांतीय आरोपी आहेत. दशहत निर्माण करण्यासाठीच वाळू तस्कर आपले पंटर नेमतात. पोलीस व महसूल विभाग यावर कारवाई न करता या गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे. पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतरही प्रशासन गाफील आहे. माणसांकरवी खोरे व घमेले वापरुन नदीपात्रातून वाळू उपसा करणे शक्य आहे. मात्र, वाळूचा मलिदा खाण्यासाठी प्रशासन व ठेकेदार हे दोघे मिळून हा चांगला मार्ग अवलंबताना दिसत नाहीत.