कोविड संकटाची भीषणता आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ऑक्सिजनची कमतरताही जाणवत असल्याने सर्वच व्यवस्थांपुढे आता आवाहनात्मक परिस्थिती बनल्याने या संकटावर मात करण्यासाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी एकत्रितपणे कृतज्ञता निधी जमा केला. या निधीतून खरेदी केलेले ऑक्सिजन कंट्रोलर मशीन ग्रामीण रुग्णालय तसेच प्रवरा कोविड केअर सेंटरला देण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पाच ऑक्सि. कंट्रोलर मशीन प्रवरा कोविड केअर सेंटरला देण्यात आले. आमदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या उपस्थितीत मशीन सुपुर्द केले.
तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, शिक्षण अधिकारी पोपट काळे, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे याप्रसंगी उपस्थित होते.