अहमदनगर : उन्हाचा चढलेला पारा, कोरडे पडलेले बोअर, विहिरीतील पाण्याने गाठलेला तळ अन् कोरडी पडलेली धरणे, यामुळे अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे. जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरने आता ७५७ चा आकडा ओलांडला असून ५०६ पाणी योजना पाणी आटल्याने बंद पडल्या आहेत. ४७३ वाड्या आणि २ हजार ६६४ वाड्या-वस्त्यांवरील १२ लाख १२ हजार जनतेला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. सलग तीन वर्षांपासून असणाऱ्या दुष्काळस्थितीमुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याने टंचाईच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. त्यात मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने ज्या ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलला पाणी होते, ते आटले आहे. मात्र, टँकर भरण्यासाठी उद्भव कमी पडत असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक आहे. जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना आणि १ हजार ३७७ स्वतंत्र पाणी पुरवठा करणाऱ्या योजना आहेत. प्रादेशिकपैकी बोटावर मोजण्याइतक्या योजना कार्यान्वित आहेत. तर स्वतंत्र योजनांपैकी ५०६ योजना बंद आहेत. जिल्ह्यात पाणी आटल्याने अकोले तालुक्यातील १, संगमनेर ३२, कोपरगाव ४, राहाता २, राहुरी २, नेवासा ३८, शेवगाव १६, पाथर्डी ५४, नगर ४५, पारनेर ६३, श्रीगोंदा १०९, कर्जत ७५, जामखेड ५०६ योजना बंद आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नसून एकही पाणी योजना बंद नाही.
१२ लाख जनतेला टँकरचे पाणी
By admin | Updated: May 22, 2016 00:17 IST