शेवगाव : ग्रामीण भागातील पाण्याचा शासकीय टँकर शेवगाव शहरात खासगी ठिकाणी रिकामा होत असताना शेवगाव पंचायत समितीच्या सभापती मंगल काटे यांनी रंगेहाथ पकडला. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. आखेगाव रस्त्यावरील साने गुरुजी दूध डेअरी परिसरात एका बांधकामावर पाणी मारत असताना हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर सभापती काटे यांनी गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली, परंतु दखल न घेतल्याने त्यांनी तहसीलदार दादासाहेब गीते यांना ही माहिती दिली. पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही, अशी सभापतींची तक्रार आहे. एकीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत असताना शासकीय यंत्रणा किती हलगर्जी व निष्क्रीय आहे, याचा प्रत्यय खुद्द सभापतींनाच आला.याबाबत अधिक चौकशी केली असता, खंडोबामाळ (शेवगाव), राक्षी, चापडगाव व अमरापूर या चार ठिकाणांहून टँकरमध्ये पाणी भरले जाते. येथे पंचायत समितीचा एकही अधिकृत कर्मचारी नसतो. ठेकेदाराचीच माणसे टँकरच्या खेपांची बोगस नोंद करीत असल्याचे आढळून आले. टँकरची कोणत्या गावाला खेप टाकायची? किती खेपा टाकायच्या? टँकर कोठून भरले जातात? याचा फलक दर्शनी भागात लावावा, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाची येथे सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात तहसीलदार दादासाहेब गिते यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)
टँकरचे पाणी खासगी बांधकामावर
By admin | Updated: May 6, 2016 23:22 IST