अहमदनगर: शहर व परिसरात मोकाट जनवारे, कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना आरोग्य समितीने सोमवारी केल्या. दरम्यान, याबाबत तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक झाली. बैठकीला माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सचिन शिंदे, माजी सभापती सचिन जाधव, संजय ढोणे, अजय चितळे, सतीश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.सुतीश राजूरकर उपस्थित होते. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेने प्रभागनिहाय मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घ्यावी, तसेच कुत्रे पकडणाऱ्या वाहनाला जीपीएस प्रणाली बसवावी, निर्बीजीकरण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कुत्र्याने चावा घेतल्यास रेबिज लस उपलब्ध करून देणे, यासह अन्य सूचना यावेळी करण्यात आल्या, तसेच मोकाट जनावरांचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे राजूरकर यांनी सांगितले, याशिवाय डुकरांमुळे नागरिक त्रस्त असल्याची बाब सदस्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शहरात डुकरांचे पालन करण्यास बंदी आहे. डुकरांचे पालन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
सूचना : फोटो १९ एएमसी नावाने आहे.