शेवगाव : तालुक्यातील घोटण व रावतळे, कुरुडगाव येथील शेतकऱ्यांना वाघोली (पुणे) येथील नर्सरी चालकाने पपईची बनावट रोपे विकली आहेत. याप्रकरणी कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांना दिले आहे.
यावेळी जनशक्तीचे महासचिव जगन्नाथ गावडे, ठाकूर निमगावचे माजी सरपंच हरिश्चंद्र निजवे, आदिनाथ कातकडे, प्रा. सखाराम घावटे, संभाजी टाकळकर, अरुण भराट, ज्ञानेश्वर मोटकर, वसंत मोटकर आदी उपस्थित होते.
वाघोली येथील एका नर्सरीतून रावतळे येथील अरुण रंगनाथ भराट यांनी रेडलेडी जातीची पपईची १ हजार ३५०, वसंत कारभारी मोटकर यांनी १ हजार १००, भाऊराव मोटकर यांनी १ हजार ८०० रोपे खरेदी केली होती. परंतु, पपईची रोपे बनावट निघाल्याने अरुण भराट यांचे जवळपास २ लाख, वसंत मोटकर यांचे २.५० लाख तर ज्ञानेश्वर मोरकर यांचे ३ लाखापर्यंतचे नुकसान झालेले आहे. पपईचे वाण खराब निघाल्याने सदरच्या पिकावर केलेला खर्च वाया गेला आहे. नर्सरी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेल्या नियमानुसार रोपांची काळजी घेऊनही रोपे जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. संबंधित नर्सरीकडे शेतकऱ्यांनी संपर्क केला असता, त्यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.
220921\img-20210921-wa0014.jpg
मागणीचे निवेदन देतांना जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे व इतर