शेवगाव : जिल्हा रुग्णालयाने सोमवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. मात्र, शेवगावचे तहसीलदार रानेगावमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे सांगत आहेत तर जिल्हा प्रशासनाने हा रुग्ण रानेगावचाच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाच्या माहितीत विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे रानेगावचा ‘तो’ रुग्ण नेमका कुठला, याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.सोमवारी दुपारी चार वाजता प्राप्त झालेल्या अहवालात शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील एक जण पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. मात्र नंतर रानेगाव येथून कोणाचेही स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले नव्हते, अशी माहिती तालुका आरोग्य विभाग व तहसीलदारांना मिळाली. कोणाचे स्वॅब घेतले नाही तरीही रानेगाव येथे रुग्ण कसा? याचा सवाल उपस्थित झाला. तालुका आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता त्या रुग्णाने रानेगावचा पत्ता दिल्याचे सांगण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनीही फोनवरुन थेट त्या रुग्णाशी संपर्क साधला. मात्र तो मुळचा बीडचा असल्याचे सांगत त्याने फोन कट केला. पुन्हा त्याला संपर्क केला असता त्याने फोनवर बोलणे टाळले. त्यामुळे हा रुग्ण नेमका कुठला, याचा संशयकल्लोळ अद्याप मिटलेला नाही.
रानेगावमधून कोणाचे स्वॅब घेतलेले नाहीत. ‘तो’ रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील आहे.-अर्चना पागिरे, तहसीलदार
रानेगावमध्ये कोणीही रुग्ण नाही. जो रुग्ण रानेगावचा असल्याचे नमूद आहे, तो प्रत्यक्षात बीड जिल्ह्यातील आहे. मात्र, त्याने रानेगावचा पत्ता टाकला आहे.-डॉ. सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी