अहमदनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेतील शाखाधिकारी सदाशिव जयवंत फरांडे याने संजय गांधी निराधार योजनेतील मयत लोकांची रक्कम हडप केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत. शाखाधिकारी सदाशिव जयवंत फरांडे याला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी स्वीकृत संचालक बाळासाहेब नरसाळे यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.
६ ऑगस्ट रोजी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी व लिपिक याने संगनमताने संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेतील अनुदान रक्कम हडप केली होती. याबाबतचा गुन्हा कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. रक्कम हडप करणाऱ्या लिपिक दीपक अनारसे याला संचालक मंडळाने तत्काळ निलंबित केले. मात्र, शाखाधिकारी फरांडे याचे निलंबन करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
जिल्हा अधिकारी कार्यालयातील लेखापरीक्षण विभागाने केलेल्या तपासणीत २३ लाख रुपयांचा अपहार असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांची रक्कम हडप असताना घाईघाईत फक्त १ लाख ४७ हजारांचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शासकीय लेखापरीक्षणनुसार गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सहकार विभागाला सहफिर्यादी करून घ्यावे, असे पत्र सभासद विनायक गोस्वामी यांनी कर्जत पोलिसांना दिले होते. त्यानुसार, कर्जत पोलिसांनी परवानगी दिली असून, तसे सहकार आयुक्तांना नुकतेच कर्जत पोलिसांनी कळविले आहे.
..................
कारवाईचा ठराव, प्रत्यक्षात निलंबन नाही
सहकार खात्याच्या चौकशी अहवालात फरांडे दोषी सापडला आहे. त्यावर दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजी ठराव क्रमांक १७ने कारवाई करण्याचा ठराव बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत झाला आहे. तसे पत्रही सहकार आयुक्त यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात फरांडे याच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही, असे स्वीकृत संचालक नरसाळे यांनी सांगितले.
.......................
...अन्यथा १६ सप्टेंबरला उपोषण
शाखा अधिकारी सदाशिव फरांडे याचे तत्काळ निलंबित करावे, अन्यथा १६ सप्टेंबर रोजी सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सैनिक बँकेचे सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाठ यांनी दिला आहे.