सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा-आपधूप-बाबूर्डी या रस्त्यासाठी आता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली. त्यामुळे हा रस्ता चकाचक होणार आहे. डिकसळ ते जामगाव या रस्त्याचाही त्यात समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जससंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांनी दिली.
दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी अनुक्रमे ६ कोटी ८० लाख व ३ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या विस्तारित औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये आपधूप व बाबूर्डी शिवारातील काही शेतजमिनीचे अधिग्रहण केले आहे. एमआयडीसीने अधिग्रहित क्षेत्रावरच रस्त्याची कामे केली. सुपा ते आपधूप व तेथून बाबूर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे या तिन्ही गावांतील नागरिकांबरोबरच परिसरातील अन्य गावातील लोकांनाही त्याचा फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तालुक्यातील डोंगरी विभागातील तिखोल ते तिन्ही करंदी, पुणेवाडी अशा १२.६३ किमी रस्त्याच्या कामासाठीही ७ कोटी ६८ लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. याच योजनेतून गरखिंडी ते अळकुटी, पाबळ निघोज रस्त्याचेही काम पूर्ण केले जाणार आहे. विखे यांच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास ४६ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २१ कोटी रुपयांचा निधी मिळाला, असे शिंदे यांनी सांगितले.