अहमदनगर : लोकमत सखी मंचच्या संस्थापिका स्व. ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘स्वरज्योती’ या हिंदी- मराठी भक्तिगीत व भजन गायनाने भावसुमनांजली वाहण्यात आली.टिळक रोडवरील सरस्वती लॉन्स येथे औरंगाबाद येथील अनघा काळे यांच्या ग्रुपने ही भजनसंध्या सादर केली. ‘स्वर’ आणि ‘सुरां’च्या अद्वितीय गुंफणीतून गीतांची तेजोमय मालिका प्रज्वलित होत ‘स्वर-ज्योती’चा उत्कट अविष्कार सखींनी अनुभवला. सुप्रसिद्ध गायिका अनघा काळे, गौरव महाराष्ट्राचा फेम रवींद्र खोमने, गौरव पवार यांच्या अद्भूत स्वरमैफिलीत रसिकजन हरवून गेले.गणेश आराधनेने भजन संध्येस प्रारंभ झाला. तर केशवा माधवा, माउली माउली, आदिमाया अंबाबाई, ऐसी लागी लगन, शिर्डीवाले साईबाबा अशा अनेक सुमधूर भावगीत- भक्तिगीतांनी आदरणीय ज्योत्स्नाभाभींना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हलक्या फुलक्या शब्दसुरांनी वातावरणात ‘सुरेल’ रंग चढविला. अभंग, नाट्यसंगीत, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय अशा संगीताच्या विविध प्रकारावर उत्तम प्रभुत्व असलेल्या गायक-गायिकांनी सखींची वाहवा मिळविली. दिलीप खिस्ती यांच्या ओघवत्या शैलीतील अभ्यासपूर्ण निवेदनाने भजन संध्येला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. जितेंद्र साळवी यांनी ढोलक, राजेंद्र तायडे यांनी सिंथेसायझर, विनोद वावळ यांनी आॅक्टोपॅड अशी साथसंगत दिली. खिस्ती यांनी स्व.ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या मोठेपणाचा संदर्भ देत केलेले निवेदन हृद्य होते. सखी मंचच्या सदस्या अलका मुंदडा, भारती भगत, बबिता गांधी, रत्ना नवसुपे, वर्षा पितळे, गुंजन भंडारी, प्रिती संचेती, रुपाली गायकवाड, विद्या बडवे, सुवर्णा बंबोरी, कुमुदिनी जोशी, सुरेखा जाजू, इंदिरा तिवारी, राणी कासलीवाल यांच्यासह उपस्थित सखींनी आदरांजली वाहिली.(प्रतिनिधी)
‘स्वरज्योती’तून सूरमयी आदरांजली
By admin | Updated: March 24, 2016 00:13 IST