अहमदनगर : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे ३१ मे रोजी साजरी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत़ उत्तर भारतात एकेकाळी हुकूमत गाजविणारे शिंदे-होळकर घराणे यानिमित्त एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे़ अहिल्यादेवी होळकरांचे चौंडी हे जन्मगाव असून, ३१ मे रोजी त्यांची २९१ वी जयंती साजरी होत आहे़ या सोहळ्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना निमंत्रण दिले असून, त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे़ या सोहळ्याच्या माध्यमातून शिंदे-होळकर घराण्याचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ जयंती सोहळ्याच्या नियोजनासाठी शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे चार दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती़ चौंडी येथील सोहळ्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आ़ गणपतराव देशमुख, माजी मंत्री अण्णा डांगे, अनिल गोटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आ़ दत्तात्रय भरणे, आ़ नारायण पाटील उपस्थित राहणार आहेत़ (प्रतिनिधी)
शिंदे-होळकर घराणे एकत्र येण्याचा योग
By admin | Updated: May 24, 2016 23:38 IST