अहमदनगर: उसाची गोडी चांगलीच वाढण्याची चिन्हे आहेत़ पारंपरिक ऊस लागवडीला फाटा देऊन रोपे तयार करून लागवड करण्याची नवी पध्दत कृषी विभागाने आणली असून, रोपांसाठी एकरी चार हजारांचे अनुदानही दिले जाणार आहे़ त्यामुळे ऊस पिकाचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होणार आहे़ऊस उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी शासनाने ऊस विकास प्रकल्प हाती घेतला आहे़ सुरुवातीला हा प्रकल्प साखर कारखान्यांमार्फत राबविला जात असे़ यंदा हा प्रकल्प आत्मामार्फत राबविला जात आहे़ ऊस लागवडीसाठी लागणारा खर्च लक्षात घेता, रोपे तयार करून लागवड केल्यास अत्यंत कमी खर्च येतो़ पारंपरिक ऊस लागवड खर्चिक तर आहेच परंतु उगवण क्षमताही कमी असते़ या पध्दतीत धोके अधिक आहेत़ रोप तयार केल्यास कोणतीही भीती राहत नाही़ रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण आत्मामार्फत शेतकऱ्यांना दिले जाते़ पूर्व हंगामी ऊस लागवडीचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे़ त्यामुळे चालू महिन्यात रोपवाटिका उभी करून रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटाची निवड करण्यात येत आहे़शेतकऱ्यांच्या एका गटास ऊस रोपवाटिकेचे प्रशिक्षण दिले आहे़ प्रत्येक तालुक्यात पाच गट तयार करण्यात येणार आहेत़ प्रत्येक गटात २० शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे़ शेतकऱ्यांनी स्वखर्चातून रोपवाटिका तयार करून उसाची रोपे तयार करायची आहेत़ त्यानंतर रोपवाटिकेची पाहणी करून छायाचित्र घेतले जाईल़ हे छायाचित्र सादर केल्यानंतर शेतकऱ्यास एकरी ४ हजार रुपये अनुदान मिळेल़ रोप वाटिकेचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळणार असून, लागवडीचा खर्चही वाचेल़ या पध्दतीने उसाची लागवड केल्यास खर्चात बचत होऊन कमी कालावधीत उसाचे पीक घेता येईल़ शेतकऱ्यांनी नवीन पध्दतीने लागवड करावी, असे आवाहन आत्माच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)पारंपरिक पध्दत बंद करून नवीन रोपे तयार करून उसाची लागवड केल्यास मोठा फायदा होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन पध्दतीने लागवड करावी, त्यासाठी त्यांना एकरी चार हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल़- शिवाजी आमले,प्रकल्प अधिकारी
उसाची गोडी वाढणार
By admin | Updated: June 12, 2014 00:09 IST