आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी राज्यात पाच ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याची घोषणा केली. त्यात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. याठिकाणी वाढीव पदांसाठी मान्यताही देण्यात आली आहे. येथील रुग्णालयाला आता स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, फिजिशियन, सहाय्यक आधी सेविका, परिसेविका, औषध निर्माण अधिकारी यांची पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर रक्तपेढी ही रुग्णालयात सुरू होणार आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी २७ पदे मंजूर आहेत. आता नव्याने होणाऱ्या पद निर्मितीमुळे ४७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सेवेत दाखल होतील. त्यामुळे श्रीरामपूरसह, राहाता, कोपरगाव, नेवासा, संगमनेर येथील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
----------
रुग्णालयाची वैशिष्ट्ये
श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला परिपूर्ण अशी आधुनिक शैलीची इमारत लाभली आहे. रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणावर जागेची उपलब्धता आहे. चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमधडे, तसेच प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड यांच्या प्रयत्नामुळे राज्य सरकारचा सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार रुग्णालयाने पटकावला आहे.
------------
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने तातडीने ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातून येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. त्याच बरोबर आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयात ५० ऑक्सिजन खाटांची सुविधा प्रदान केली आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांना येथे दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
----------
फोटो आहे : श्रीरामपूर रुग्णालय
श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला अशी आधुनिक शैलीची प्रशस्त इमारत लाभली आहे.
--------