अहमदनगर : जिल्ह्यात अद्यापही दररोज तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा यंत्रणेला दिल्या आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी महसूलमंत्री थोरात यांनी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, अहमदनगर महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची उपस्थिती होती.
काही तालुक्यात अद्यापही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने तेथे सर्वेक्षण करून बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सध्या लसीकरणाचा वेग काहीसा कमी आहे. केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्राप्त झालेल्या लसींचे योग्य नियोजन करून त्याचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. राज्य पातळीवर पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी लसींचा अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा काही प्रमाणात तुटवडा होता. संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल यादृष्टीने जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही थोरात यांनी घेतली. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसोबतच मेडिकल ऑक्सिजन साठवणुकीसाठी व्यवस्था निर्माण करण्याचे काम जिल्ह्यात होत आहे. संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला जाईल, याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.