श्रीरामपूर : गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखालील मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या चौकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन विटंबना झालेली मूर्ती तत्काळ हटवून तिच्या जागेवर नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.सकाळी दुकानदार दुकान उघडण्यास आले असता नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले असता मूर्तीची विटंबना झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे अशोक थोरे, शहरप्रमुख सचिन बडदे, राजेंद्र चव्हाण, देविदास चव्हाण, भाजपचे अभिजित कुलकर्णी आदी कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ, सहायक निरीक्षक अरविंद भोळे, शिवाजी पाळंदे, फौजदार सुधीर पाटील यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सामंजस्य व सहकार्याने शांतता व सलोखा ठेवण्यात यश मिळविले. दुसरी संगमरवरी दगडी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. याप्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. (प्रतिनिधी)
मूर्ती विटंबनेनंतर तणाव
By admin | Updated: May 20, 2016 23:56 IST