शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने व सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी दिला आहे.
वीज वितरण कंपनीचे अभियंता एस. एम. लोहारे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमनाथ आंधळे, जालिंदर बर्डे, बाळासाहेब बर्डे, भुजंग फुंदे, अर्जुन काशीद, ऋषिकेश ढाकणे, हेमंत पातकळ आदी उपस्थित होते.
पूर्व भागातील बालमटाकळी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत आहे. कोणत्याही शेतकऱ्याचे शेतीपंप चालत नाहीत. कमी-जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने कित्येक शेतकऱ्यांचे शेतीपंप जळाले आहेत. गोळेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीही जळाल्या असून, गेल्या २० तारखेेला रोहित्र निकामी झाले आहेत.
विस्कळीत झालेल्या विद्युत प्रवाहामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना गमवावा लागेल, अशी स्थिती तयार झाली आहे. गोळेगाव येथील पाणी वाटपाची मोटारही गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.