बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी परिसरातील कपाशीला बोंड आळी रोगाने ग्रासले असून त्यामुळे कपाशीचे पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे कपाशीचे सरसकट पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवी, या मागणीसाठी शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेवगाव-गेवराई या महामार्गावर बालमटाकळी येथे सुमारे दीड ते दोन तास हा रास्ता रोको होता़ श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय कासुळे यांनी पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात रामनाथ राजपुरे, कासम शेख, मोहनराव देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब देशमुख, वसंत घाडगे, भास्कर बामदळे, अंकुश पोळ, पांडुरंग वैद्य, दिलीप गरड, छगन राजपुरे, सुरेश बमदळे, तुळसीदास भोंगळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके, गावडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी कासुळे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, बोधेगाव मंडळ कृषी विभागातील कर्मचारी, तलाठी लोहकरे, ग्रामसेवक काटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शेतक-यांचा प्रश्न समजून घेतला.
कपाशीच्या नुकसानभरपाईसाठी बालमटाकळीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:59 IST