शेवगाव : शेवगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे शहरातील साफ सफाईचे कामेही ठप्प झाल्याने बाजारपेठेसह शहरात ठिकठिकाणी कचरा, घाण मोठ्या प्रमाणात साचल्याचे व सर्वत्र कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत़ ग्रामपंचायतीची घंटागाडी सुविधाही बंद असल्याने घरात साचलेल्या कचऱ्याचे करायचे काय, या विवंचनेमुळे महिला हैराण झाल्या आहेत. सर्वत्र कचरा, घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याची समस्याही ऐरणीवर आली आहे.शेवगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाबाबत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू साळवे यांनी सांगितले की, १५ आॅगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारवाढीची घोषणा केली़ त्यामुळे प्रत्येक वर्षी पगारवाढ मिळत आहे. मात्र यंदा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली नाही़ पगारवाढीबाबत ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत आहे़ त्यामुळे कामगारांना बेमुदत कामबंद आंदोलन करावे लागल्याचे साळवे यांनी सांगितले़शेवगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब डोईफोडे म्हणाले की, शेवगाव ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या २४५ असून, पगारासाठी महिन्याकाठी ९ लाख रुपयांची रक्कम खर्ची होते. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्रामपंचायतीचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही़ याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेला दिली. मात्र तरीही ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, ते दुर्दैवी असल्याचे ग्रामविकास अधिकारी डोईफोडे म्हणाले.शेवगाव शहराची लोकसंख्या ४० हजाराच्याही पुढे जाऊन पोहचली आहे. शहराचा विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामस्थांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ तर कर्मचाऱ्यांकडून वारंवार बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे़ विविध मागण्यांखाली कर्मचारीही ग्रामस्थांची कोंडी करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ नागरिकांची अडवणूक व कोंडी थांबविण्याची मागणी होत आहे़ (तालुका प्रतिनिधी)
पगारवाढीसाठी काम बंद
By admin | Updated: August 24, 2014 02:06 IST