अहमदनगर येथून खते घेऊन मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.१६, सी.सी.७६७७) घारगाव येथे साईनाथ कृषी भांडार येथे बुधवारी आला होता. खते खाली केल्यानंतर ट्रक नादुरुस्त झाल्याने समोरील पार्किंगमध्ये लावण्यात आला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पार्किंगची मागील बाजूची जाळी तोडली. यात एका चोरट्याने पार्किंगमध्ये असलेल्या बल्बची वायर कट केली. बल्ब बंद झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी ट्रकचे चार टायर लंपास केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
टायर चोरी गेल्याचे मंगळवारी सकाळी साईनाथ कृषी भांडार येथील मॅनेजर विजय गडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी घारगाव पोलिसांना कळविले. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासून अहमदनगर येथील श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आजूबाजूला टायरचा शोध घेतला; मात्र टायर मिळून आले नाही. टायर चोरीची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे चोरट्यांना कळताच चोरट्यांनी टायर चोरी गेलेल्या ठिकाणच्या लगतच्या शेतात आणून टाकले आहेत. पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी टायर ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.