शेवगावच्या आदर्श शिक्षिका शुभांगी शेलार यांनी २ ते ४ जून या कालावधीत या राज्यस्तरीय छंद वर्गाचे आयोजन केले होते. त्यात राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी टेमकर बोलत होते. सलग तीन दिवस चाललेल्या या छंदवर्गाचे उद्घाटन डायटचे (संगमनेर) प्राचार्य दगडू सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी शेवगावचे गट शिक्षणाधिकारी रामनाथ कराड, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, तसेच उत्तर आफ्रिका येथील योग अभ्यासिका रचना फासाटे सहभागी झाले होते. अशा नवोपक्रमाची आज खरी गरज आहे, असे मत सूर्यवंशी यांनी मांडले. हा छंदवर्ग म्हणजे बालमनासाठी एक स्तुत्य व आगळावेगळा आनंददायी उपक्रम आहे, असे पारनेरचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले. हा छंदवर्ग संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरेल, असे मत मांडताना रामनाथ कराड यांनी सर्व विद्यार्थी, आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते विक्रम अडसूळ, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ज्योती बेलवले यांनीही यात मार्गदर्शन केले. या तीन दिवसात एकूण आठ सत्रांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये कोविड काळात विद्यार्थ्यांचे मन सुदृढ राहावे म्हणून योगा-प्राणायाम, मोबाइलचा वापर, विविध शैक्षणिक ॲपची माहिती, गीतगायन, चित्रकला, कार्यानुभव, कागदकाम, वैज्ञानिक प्रयोग आदी तासिका घेण्यात आल्या. यामुळे कोरोना महामारीमुळे बंदिवासात असणाऱ्या मुलांना व्यक्त होण्यासाठी उत्कृष्ट आभासी व्यासपीठ मिळाले. प्रतिभा गोसावी, रफिक सय्यद, अंजुम सय्यद, संतोष लिमकर, राज्य पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षिका रंजना स्वामी, डॉ. गीतांजली शेलार, कृष्णाताई उंदरे, सविता बुधवंत आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज्यभरातून पाच हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते.