तसेच काही दिवसांपूर्वी रेशन धान्य वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली. यात दोषी आढळून येणाऱ्यांवर शासनाची कारवाई होईलच. कुणाचीही पाठराखण करणार नाही. आपल्याकडे चुकीला माफी नाही, असे स्पष्ट करत विरोधकांच्या चर्चेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
गुरुवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेतून तालुक्यातील कोविड स्थितीची माहिती दिली. तत्पूर्वी दिवंगत पत्रकार सुभाष खरबस यांना तालुक्याच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तहसीलदार मुकेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय घोगरे, नोडल अधिकारी डॉ. शाम शेटे, भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, स्वाती शेणकर उपस्थित होते.
२८ सरकारी डाॅक्टरांच्या टीमने कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा दिली. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नव्हते. आता वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र आरोग्य कर्मचारी यांची ३३ पदे रिक्त आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाची तिसरी लाट तालुक्यात पोहोचण्यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय अकोल्यात आणण्याचा प्रयत्न आहे.
कोरोनाची तिसरी लाट अकोल्यात पोहोचू न देण्यासाठी बालरोगतज्ज्ञ अभिनव लहामटे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात ५० व विभागवार प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभे केले जात असून अगस्ति आश्रम येथे बालकांचे कोविड सेंटर उभे करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
१२० सिलिंडर भरतील व १०० रुग्णांना एकावेळेस ऑक्सिजन पुरेल असा १ कोटी ५६ लाखाचा ऑक्सिजन प्रकल्प अकोले ग्रामीण रुग्णालयात १५ जूनपर्यंत कार्यान्वित होईल. आमदार निधीतून तीन रुग्णवाहिका दिल्या. आणखी तीन रुग्णवाहिका लवकरच येतील. नोडल अधिकारी यांच्या मागणीनुसार आरोग्य विभागाचा स्टाफ सध्या पुरेसा आहे. औषधसाठा पण आहे.
क्रिटिकल परिस्थितीत खासगी डाॅक्टर यांची टीम सेवा देण्यासाठी तयार केली जाणार आहे. खासगी डाॅक्टर यांना कोरोना मुक्तीसाठी गाव दत्तक घेण्याबाबत विनंती केली जाणार आहे. पेशंट डिस्चार्जपूर्वी प्री ऑडिट होणार असल्याने रुग्णांची लूट थांबेल.