सर्वत्र शोध घेऊनही फरार बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी कायदेशीर बाबींचा आधार घेतला आहे. त्याला न्यायालयाकडून फरार घोषित करण्यासाठी प्रथम त्याच्या विरोधात तपासी अधिकारी अजित पाटील यांनी स्टँडिंग वॉरंटला मंजुरी घेतली आहे. या वाॅरंटमुळे आता बोठे याचा शोध घेण्यासाठी नगरच्या पोलिसांना राज्य व राज्याबाहेरील पोलिसांचीही मदत होणार आहे. बोठे फरार असल्याने पोलीस त्याच्या घरी जाऊन वॉरंटची बजावणी करू शकतात. येत्या काही दिवसांत बोठे मिळून आला नाही तर पोलीस त्याला फरार घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज करू शकतात, तसेच येणाऱ्या काळात त्याच्या मालमत्तेवरही टाच येऊ शकते. त्यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बोठे याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. पुढील आठवड्यात या अर्जावर सुनावणी होणार आहे. स्टँडिंग वॉरंटसंदर्भात बोठे याने पारनेर न्यायालयात ॲड. संकेत ठाणगे यांच्या माध्यमातून हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र पोलिसांचा अर्ज मंजूर करीत वॉरंटला मंजुरी दिली आहे.
बोठे हलवतोय सूत्रे...पोलिसांची होतेय दमछाक
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाली. त्यानंतर बोठे पसार झाला. या घटनेला महिना उलटला आहे. तीन ते चार पोलीस पथके बोठेचा शोध घेत आहेत. तो मात्र पोलिसांना गुंगारा देत आहे. बोठे फरार असतानाही वकिलांच्या संपर्कात राहून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करीत आहे. पोलिसांना मात्र त्याच्या संपर्क यंत्रणेचा पर्दाफाश करता येईना. नगरच्या पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर हा तपास स्कॉटलंड यार्ड पोलीस अथवा एनआयएकडे तरी द्यावा, अशी उपहासात्मक मागणी येथील जागरूक नागरिक फोरमचे अध्यक्ष सुभाषभाई मुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा लौकिक आहे. या शाखेला मात्र बोठे सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना बोठे याला जेरबंद करून शाखेचा लौकिक कायम ठेवण्याची संधी आहे. प्रत्यक्षात मात्र बोठेच्या शोधात एलसीबी टीमचीही दमछाक झाल्याचे दिसत आहे.