शेवगाव : एस.टी.सुविधेपासून वंचित असलेल्या तालुक्यातील पुर्नवसित लाखेफळ येथे विभागीय कार्यालयाच्या सूचनेनुसार सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या एस.टी. सेवा सुरू करण्याच्या मागणीला मूर्तस्वरुप येण्याची चिन्हे आहेत.शेवगावपासून दक्षिणेला १८ कि.मी. अंतरावर सुमारे एक हजार लोकवस्तीचे लाखेफळ गाव आहे. येथे एस.टी. सेवा नसल्याने ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद सोनावणे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात एस.टी. सुरू व्हावी, यासाठी शेवगावचे आगार व्यवस्थापक, नगरचे विभागीय नियंत्रक यांना निवेदने देऊन पाठपुरावा केला. विभाग नियंत्रकांनी हा प्रस्ताव मुंबई येथील विभागीय कार्यालयात सादर केला. आतापर्यंत एरंडगावपर्यंत एस.टी. सेवा उपलब्ध होती. परंतु त्यानंतर पुढे तीन कि.मी. अंतरावरील लाखेफळला जाण्यासाठी प्रवाशांना पायी जावे लागत होते. गावातील २५ ते ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी रोज शेवगाव येथे विद्यालय, महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. मात्र गावात जाणारी बस सेवा उपलब्ध नसल्याने शाळकरी मुलांना एरंडगावपर्यंत जवळपास ३ कि.मी. पायी जाऊन त्यानंतर शेवगाव येथे जावे-यावे लागत असल्याने अनेकांना विविध अडचणींशी सामना करण्याची वेळ येत होती.एस.टी. महामंडळाच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार वाहतूक निरीक्षक शहादेव गर्जे यांच्या नेतृत्वाखालील पथक नवीन बस सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणासाठी दाखल झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी स्वागतासाठी एकच गर्दी केली. गुलालाची उधळण करून तसेच पेढे वाटून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हाती घेतलेल्या घोटण ते लाखेफळ रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गावापर्यंत जाणारा रस्ता पक्का झाल्याने गावकऱ्यांचे एस.टी. सेवेचे स्वप्न सर्वेक्षणाच्या या कामानंतर आता अंतिम टप्प्यात आहे. गावासाठी तातडीने बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रभारी सरपंच शरद सोनवणे यांनी केली. बाळासाहेब बनकर, गोरक्ष फुंदे, शिवाजी आव्हाड, राम धस, सोमनाथ कुंडार, ग्रामस्थ यावेळी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
लाखेफळ गावाने प्रथमच पाहिली एस.टी.
By admin | Updated: May 20, 2016 23:57 IST