तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव पंचक्रोशीत मे महिन्याच्या मध्यावर पडणारा वळवाचा पाऊस रूसल्याने शेत मशागती रखडल्या. पुढील मुख्य पावसाची नक्षत्रेही हवेत विरली. त्यामुळे पश्चिम भागात जुलैच्या पहिल्या सप्ताहात खुरपणी योग्य होणारी खरिपाची पिके अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसऱ्या बाजूला जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तिसगाव उपबाजार समिती आवारात जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर चारा म्हणून ऊस विक्रीस येत आहे. सुका चारा संपल्याने दुभत्या जनावरांचा ऊस हाच मुख्य आहार बनला असल्याचे बाजार समितीच्या संचालिका सीमा चितळे यांनी सांगितले. या हंगामात दोनच पाऊस झाले. वृद्धेश्वर कारखाना येथील पर्जन्यमापकावर नऊ जून रोजी केवळ १३ मिलिमीटर, तर २८ जून रोजी ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस निम्माच असल्याने नांगरणी केलेली शेतातील ढेकळे तशीच आहेत. येणाऱ्या आठ दिवसांत मेघराजा बरसला तरी अगोदर मशागती करून पुन्हा पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा राहणार असल्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. वसंत डमाळ म्हणाले.
खरीप पिकांची पेरणी लांबत असल्याने याचे सर्वगामी परिणाम कांदा पिकांसह रब्बीतील पिकांवर संभवणार आहेत. कपाशी, बाजरीनंतर रोप टाकून कांदा लागवड उशिराने होईल. थंडीच्या हवामानाचा नैसर्गिक लाभ कांदा पिकांना कमी मिळेल, असे कांदातज्ज्ञ उद्धवराव शिरसाठ यांनी सांगितले.
---
मोठ्या पावसाची आस..
ढवळेवाडी, कासार पिंपळगाव, जवखेडे, निवडुंगे, श्री क्षेत्र मढी, हनुमान टाकळी, कोपरे, वाघोली, आडगाव भागात दोन पाऊस झाले असले तरी दोन किलोमीटरच्या अंतरात हे प्रमाण कमीअधिक आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची परिसराला आस लागली आहे.