राहुरी (जि. अहमदनगर) : गतवर्षी रब्बी ज्वारीखालील क्षेत्र ४३ टक्क्यांनी कमी झाले आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी होऊनही उत्पादन ३१ टक्क्यांनी वाढले आहे. ज्वारीचे उत्पादन वाढण्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारी वाणांचा मोठा वाटा आहे, असा दावा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केला आहे.
महाराष्ट्रात रब्बी ज्वारीखाली सन २०२०-२१ मध्ये १६.६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होती. त्यामध्ये २३ टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे, ४८ टक्के मध्यम जमिनीचे, तर २९ टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. मागील वर्षी राज्याला १७.४ लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले. राज्यामधील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी २५ टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विकसित वाणांखाली आहे. हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माउली, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, भारी जमिनीसाठी फुले वसुधा, बागायतीसाठी फुले रेवती, तर ज्वारीच्या इतर उपयोगांसाठी म्हणजेच हुरड्यासाठी फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी, पापड बनविण्यासाठी फुले रोहिणी या वाणांचे संशोधन विद्यापीठाने केले आहे. ज्वारीवर येणाऱ्या खोडमाशी व खडखड्यासारख्या कीड व रोगांना प्रतिकारक्षम वाण आहे. फुले रेवती वाणाच्या भाकरी व कडब्याची चव पारंपरिक मालदांडीसारख्या वाणाप्रमाणेच असल्याचे विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितले.
----------
महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे रब्बी ज्वारीचे विविध वाणांचे मूलभूत, पायाभूत बियाण्यांची निर्मिती केली जाते. हे मूलभूत बियाणे महाबीजला दिले जाते. या मूलभूत बियाण्यांपासून महाबीज पायाभूत, सत्यप्रत आणि प्रमाणित बियाण्यांची निर्मिती करून शेतकऱ्यांना देते. विद्यापीठाने जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारीचे वाण विकसित केलेले आहे. शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड करावी.
-डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
----------
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या वाणांमुळे आणि उत्पादन तंत्रज्ञानामुळे राज्याची ज्वारीची उत्पादकता दुपटीवरून अधिक वाढली आहे. सन २०११-१२ मध्ये राज्याची ज्वारीची उत्पादकता हेक्टर ५.५ क्विंटल होती. सन २०२०-२१ मध्ये राज्याची ज्वारीची उत्पादकता हेक्टरी १०.५ क्विंटल झाली आहे. ही उत्पादकता विद्यापीठाने विकसित ज्वारींच्या वाणांमुळे आहे.
-डॉ. शरद गडाख, संचालक संशोधन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
--------------