लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने राज्यात ६ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे नागरिकांनादेखील बाहेर पडण्यास मर्यादा आल्या होत्या. तसेच अत्यावश्यक सेवेची वाहतूक वगळता रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी कमी होती. मात्र, काही दिवसांपासून बाधित येणाऱ्या रुग्णाची संख्या घटल्याने अनलॉक करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने अनलॉक होताच शासकीय तसेच रुग्णालयांच्या अपघात विभागात गर्दी वाढली आहे.
कोपरगाव तालुका हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रथम जिल्हा मार्ग यासह ग्रामीण पातळीवरील रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग वगळता राजमार्ग यासह इतर सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान नगर-मनमाड, कोपरगाव - श्रीरामपूर या राज्य मार्गावर वाहनांचे प्रमाण अत्यल्प होते. गेल्या काही वर्षात या मार्गाची दैन्यावस्था झालेली आहे. परंतु, अनलॉकनंतर या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे, त्यामुळे कोपरगाव तालुका हद्दीत वाहनाचा अपघात नित्याचा झाला आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अपघातात तसेच अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांची संख्या ३५७ इतकी आहे. यात बहुतांश मृत्यू हे अपघातामुळे झाले असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
...........
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ३ वर्षात नोंद झालेले मृत्यू
२०१९ - ११९
२०२० - १०६
२०२१ ( २१ ऑगस्टपर्यंत ) - १३२
...........
दारू हेही एक कारण
अनलॉकमध्ये दारूची दुकाने तसेच महामार्गावरील हॉटेल खुले झाले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालक हे दारू पिऊन वाहन चालवितात त्यातून अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच अल्पवयीन मुले देखील सर्रासपणे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढलॆ आहे. त्यामुळेसुद्धा अपघात होत आहेत.
........
ग्रामीण रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून तर आत्तापर्यंत ३५७ अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी १३० या आत्महत्या असून उर्वरित २२७ मृत्यू हे विविध अपघातातील आहेत. बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी अथवा अपघातात जागीच मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी शिर्डीसह इतरत्र नेले जाते. त्यामुळे हा आकडा आणखीही जास्त असू शकतो.
- डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव
...............
स्टार १०६३