केडगाव : चार वर्षांचा मुलगा केवळ मोबाईल मागतो. नाही दिला तर जेवणावर बहिष्कार टाकतो. आठ वर्षाचं पोरगं वडिलांच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहतं. दोन वर्षांच्या छकुलीला मोबाईल दिला की ती रडायचे थांबते, अशा एक ना अनेक समस्यांनी पालक, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि एकूणच समाजव्यवस्था चिंतेत आहे. नव्या ॲप्स व गेमचा भरणा असलेले स्मार्टफोन नवीन पिढीतील नैसर्गिक स्मार्टनेसपणा हिरावून घेत असल्याचे वास्तव आता समोर येत आहे.
मोबाईलच्या व्यसनामुळे मुले आता मैदानी खेळांकडे पाठ फिरवत आहेत. ‘ब्लू व्हेल’ गेममुळे अनेक कोवळ्या जीवांना जीव गमवावा लागल्यानंतर आता ‘पब्जी’ या गेमने मैदानी खेळांची वाट लावली आहे. सध्या ८० टक्के पालक मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. आपल्या कामात अडथळा नको म्हणून यू ट्यूब किंवा गेम लावून दिला की बाळ गुपचूप खेळते, असा पालकांचा समज आता घातक वळणावर येऊन ठेपला आहे.
---
अति स्क्रिन वापर ठरतोय घातक
अतिरिक्त स्क्रिन वापर ही वाढत्या वयातील मुलांमध्ये डोळ्याचे दोष निर्माण करणारी गोष्ट आहे.
अनेक मुले तासन् तास मोबाईल पाहतात. अंधारामध्येही मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक असते. सतत स्क्रिनवर पाहिल्यामुळे मुलांमध्ये डोळ्यांचे दोष निर्माण होतात. स्क्रिनच्या प्रकाशामुळे किंवा किरणांमुळे केवळ त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो इतकेच नव्हे, तर त्यांच्या झोपेच्या चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होते. मुले मोबाईल पाहताना इतकी तल्लीन होतात, की त्यांना काय आणि किती खावे याचे भान राहत नाही.
----
बसण्याच्या पद्धती मध्येही झाला बदल
संगणक आणि मोबाईल तसेच टीव्हीच्या स्क्रिनसमोर बराच वेळ बसल्यामुळे मुलांची बसण्याची पद्धत बदलते. ही मुले पोक काढून बसतात. त्यामुळे त्यांच्या पाठीला बाक येऊ लागला आहे. प्रौढांमध्ये ही समस्या नेहमी आढळत होती. आता हा त्रास लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिकेतील कायरोपरॅक्टर डॉ. पीटर ओटेन यांनी केलेल्या अभ्यासानुसार फावल्या वेळातील मनोरंजनासाठी संगणकाच्या वाढत्या उपयोगामुळे या साधनांवर मुले घालवत असलेला वेळ सातत्याने वाढता आहे. जी मुले स्क्रिनसमोर अधिक प्रमाणात वेळ घालवतात, त्यांची वागणूक आक्रमक, हिंसक दिसते.
---
आमच्या काळात शिक्षण पद्धतीत झालेल्या बदलामुळे आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अध्ययन पद्धतीत खूप बदल झाले आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मोबाईलच्याद्वारे ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे मोबाईलवर असलेले खेळ यामुळे घराबाहेर पडता येत नाही. कोणीही खेळायला येत नाही व बोलवत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे मित्रांनाही खेळायला येऊन देत नाही.
-साई भारत कांडेकर,
विद्यार्थी
----
एक दिवसाआड शाळेतून ऑनलाईन अभ्यास दिला जातो. दोन तास अभ्यास मोबाईलवर करावा लागतो . मोबाईलमधून शिकवलेले जास्त कळत नाही. मोबाईल जास्त वापरता येत नाही. ॲपला अडचणी येतात.
- प्रथमेश मोहिते,
विद्यार्थी
---
मोबाईलच्या जास्त वापरामुळे लहान मुलांमध्ये डोळे, डोके दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांना धुरकट दिसणे, मोबाईलमध्ये जास्त वेळ गेम खेळल्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याचे प्रकार जास्त वाढले आहे.
-डॉ. रावसाहेब बोरुडे,
नेत्रतज्ज्ञ
---
मोबाईलसाठी मुले फार हट्टी झाले आहेत. मोबाईलमध्येच मुले मग्न होत आहेत. गेम खेळताना घरामध्ये, जेवणाकडे लक्ष देत नाही. मोबाईल त्यांच्या हातातून घेतला तर चिडचिड करतात.
रवींद्र झिने,
पालक
---
पूर्वीच्या आमच्या काळात मैदानी खेळ खेळले जायचे. यामध्ये हुतूतू, आट्यापाट्या, विटीदांडू, सुरपारंब्या, लींगोरचा, भोवरा, गोट्या असे खेळ खेळले जात होते. मात्र आता सोशल मीडियामुळे या खेळाचा विसर पडला आहे. जुने खेळ आता पहायला मिळत नाही.
- देवा होले,
जुन्या पिढीतील खेळाडू
---
मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुले चिडखोर बनत आहेत. त्यांच्यातील एकाग्रता नाहीशी होत आहे. त्यांच्या जीवनात एकलकोंडेपणा वाढत आहे. सहनशीलता हा गुण त्यांच्यातून संपत आहे. एकूणच अशी मुले मानसिकदृष्ट्या रोगी दिसून येतात.
-डॉ. अमित सपकाळ,
मानसोपचार तज्ज्ञ