अहमदनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत 'मी पुन्हा येईन' ही घोषणा दिली होती. ही घोषणा राज्यभर चर्चेचा विषय ठरली. आता अहमदनगर जिल्हा बँकेतही 'मी पुन्हा येईन', असे म्हणत तालुक्यातील शिलेदारांनी दंड थोपटले आहेत. विकास सेवा सहकारी संस्था मतदासंघातून माजी संचालक पुन्हा संचालक म्हणून येतील, अशी चर्चा सध्या राजकीय वतुर्ळात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या मतदारसंघातून सर्वच तालुक्यांतील बड्या नेत्यांचेच अर्ज दाखल आहेत. हे नेते मागील काही वर्षांपासून बँकेचे संचालक आहेत. शेवगावचे चंद्रशेखर घुले, तर राहत्याचे अण्णासाहेब म्हस्के हे पुन्हा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. इतर बारा तालुक्यांतही माजी संचालकांनीच उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी अप्रत्यक्षरित्या 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला आहे. बँकेवर संचालक म्हणून जाईनच आणि तेही बिनविरोधच, अशी खुणगाठ अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह निम्म्याहून अधिक संचालकांनी बांधलेली दिसते. बँकेचे अध्यक्ष गायकर हे अकोले तालुक्यातील आहेत. त्यांच्याविरोधात सुरेश गडाख व दशरथ सावंत यांचे अर्ज आहेत. अध्यक्षपद भूषविल्यानंतरही गायकर यांनी पुन्हा बँकेच्या निवडणुकीत उडी घेतल्याने या तालुक्यात चुरस आहे.
जामखेडमधून जगन्नाथ राळेभात यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून सुरेश भोसले यांचा अर्ज आहे. संचालक राळेभात यांना पुन्हा बँकेत येण्यापासून राष्ट्रवादी रोखू शकेल का, हा प्रश्न आहे. कर्जतमधून अंबादास पिसाळ हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उरतले आहेत. कोपरगावमधून बिपीन कोल्हे यांचे चिरंजीव विवेक हे विकास सेवा संस्था मतदारसंघातून मैदानात उरतले आहेत. कोल्हे यांच्याविरोधात तीन अर्ज आहेत. नगर तालुक्यातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा निवडणूक लढवित आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला यांनीही अर्ज दाखल केला आहे. मागील पंचवार्षिक संचालक मंडळात लंघे यांचा समावेश नव्हता. राहुरी तालुक्यातून अरुण तनपुरे हे पुन्हा निवडणूक लढवित आहेत. बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ हे संगमनेर तालुक्यातून निवडून आले होते. परंतु, थोरात गटाकडून माधवराव कानवडे यांनी अर्ज दाखल केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातून करण ससाणे यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भानुदास मुरकुटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी इतर मतदारसंघातील आपले अर्ज मागे घेतले आहेत.
....
मंत्री, आमदारही बँकेच्या आखाड्यात
नेवासामधून मंत्री शंकरराव गडाख हे निवडणूक लढवित आहेत. त्यांचे वडील, ज्येष्ठ नेते यशंतराव गडाख हे यापूर्वी बँकेचे संचालक होते. पारनेर तालुक्यातून उदय शेळके हे संचालक आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. परंतु, या मतदारसंघातून आमदार नीलेश लंके यांनीही आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे पारनेरमधून शेळके की, लंके याची उत्सुकता आहे. शेवगाव - पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे, कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनीही बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेला आहे. बिगर शेती मतदारसंघातून आमदार अरुण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे.
...
श्रीगोंद्यातून जगताप, नागवडे, पानसरे, पाचपुतेंमध्ये संघर्ष
श्रीगोंदा तालुक्यातून दत्ता पानसरे व राजेंद्र नागवडे हे मागीलवेळी संचालक होते. चालू वर्षी माजी आमदार राहुल जगताप यांनी विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केलेला आहे. माजी संचालक राजेंद्र नागवडे यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. तसेच वैभव पांडुरंग पाचपुते यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. याशिवाय दत्ता पानसरे यांनीही इतर मतदारसंघातून पुन्हा अर्ज दाखल केलेला असल्याने या तालुक्यात बड्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.
....
कर्जत -जामखेडमध्ये पवारांसमोर आव्हान
कर्जतमधून अंबादास पिसाळ यांनी, तर जामखेडमधून राळेभात यांनी पुन्हा अर्ज दाखल केलेले आहेत. हे दोन्ही उमेदवार विखे गटाचे आहेत. त्यांना पुन्हा रोखण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पिसाळ व राळेभात यांना रोखण्याचे पवार यांच्यासमोर आव्हान आहे.
.....
इतर मतदारसंघातही पुन्हा येईन, म्हणणारे अधिक
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून माजी आमदार वैभव पिचड, महिला राखीवमधून आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी चैताली काळे, मीनाक्षी सोळुके यांनी पुन्हा अर्ज दाखल केले आहेत. बिगर शेती मतदारसंघातून दत्ता पानसरे, शेतीपूरकमधून रावसाहेब म्हस्के यांनी पुन्हा अर्ज दाखल केले आहेत.