संगमनेर पोलीस ठाण्याकडून ४ जुलै २०२० रोजी जिल्हा अधीक्षकांकडे आलेल्या प्रस्तावात आरोपी शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे (वय ३८, रा. धांदरफळ, ता. संगमनेर), अजय रावसाहेब निळे (वय २०, कौठे धांदरफळ) व विशाल पोपट निळे (रा. कौठे धांदरफळ, ता. संगमनेर) यांच्यावर वाळू चोरी, विनयभंग, दुखापत करणे, शिवीगाळ करणे आदी गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षकांनी या तीन आरोपींना नगर जिल्ह्यातून १५ महिन्यांकरिता हद्दपार केले.
याशिवाय शिर्डी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार आरोपी नितीन अण्णा धीवर (वय ३२, भीम नगर, शिर्डी), सचिन सीताराम गायकवाड (वय ३२, शिर्डी) यांना १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावात आकाश दिनकर सौदागर (वय २०, रा. बोरावके काॅलेजजवळ, श्रीरामपूर) याच्यावर बळजबरीने चोरी करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. त्यानुसार सौदागर यास २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
या सर्वांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार कारवाई करण्यात आली.