अहमदनगर : भुयारी गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी रस्त्याची चाळण करणाऱ्या ठेकेदाराविरोधात महापालिकेतील पदाधिकारी एकवटले आहेत. कारवाईची मागणी होऊन प्रशासन हातावर हात धरून बसले असून, भुयारी गटार योजनेचे काम करणाऱ्या ड्रीम कन्सट्रक्शनला कुणाचे अभय आहे? , असा सवाल नागरिकांकडूनच उपस्थित केला जात आहे.
भुयारी गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरातील १२५ कि.मी. चे रस्ते खोदण्यात येणार आहेत. यापैकी ५० कि. मी. चे रस्ते खोदून त्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते बुजविण्याचा आदेश ठेेकेदार संस्थेला देण्यात आला होता. याबाबत तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कार्यकाळात ठेकेदारासोबत अनेक बैठका झाल्या. या बैठकीला ठेकेदार स्वत: उपस्थित राहत नसल्याचे तक्रार वाकळे यांनी सभागृहात केली होती. लॉकडाऊन असल्याने वाहतूक बंद होती. दुरुस्तीसाठी रस्तेही मोकळे होते. परंतु, पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते बुजविले गेले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चिखल झाला. रस्त्यांवरून पायी चालणे यामुळे कठीण झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्यांची दुरावस्था झाली. ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणी मागील सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून केली गेली. त्यावर आयुक्तांनी खुलासा केला. त्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु, महिना उलटूनही रस्ते दुरुस्त झालेच नाहीत. त्यानंतर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही सभापती अविनाश घुले यांनी ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. महापौर रोहिणी शेंडगे यांनी मंगळवारी याबाबत बैठक घेतली. त्यांनी रस्ते दुरुस्त न केल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा आदेश दिला. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती आणि त्यानंतर महापौरांनी रस्त्यांबाबत बैठक घेतली. परंतु, परिणाम शून्य असून, ठेकेदाराला कोण पाठीशी घालत आहेत, याचा शोध घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून उमटत आहे.
....
दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव लालफितीत
भुयारी गटार योजनेचे काम घेतलेला ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये ठेकेदारासह सल्लागार संस्थेवर ताशेरे ओढण्यात आले होते. परंतु, हा प्रस्तावही लाल फितीत अडकला आहे. एकूणच प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
...