कोपरगाव : यंदाच्या महाशिवरात्रीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने कोपरगाव शहरातील तसेच तालुक्यातील सर्वच महादेव मंदिरात गुरुवारी (दि. ११) शुकशुकाट होता. शिवरात्रीच्यानिमित्ताने होणारे सर्वच उत्सव रद्द झाल्याने शिवभक्तांचा हिरमोड झालेला दिसला.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी काठी असलेल्या चासनळीतील माणकेश्वर व रामेश्वर महादेव, मोर्वीसचे मोरेश्वर, मंजूर मधील सिद्धेश्वर महादेव, मळेगाव थडी येथील रामेश्वर महादेव, कुंभारीचे राघवेश्वर महादेव, कोपरगावातील शुक्लेश्वर व कचेश्वर महादेव, संवत्सर येथील शृंगऋषी महादेव, कोकमठाण मधील विभांडक ऋषी महादेव, हेमाडपंथी महादेव, कान्हेगावातील कान्हेश्वर महादेव, वारीचे रामेश्वर महादेव, पुणतांबा येथील मलिकार्जुन व मामा-भाचे महादेव मंदिरात तसेच बेटातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमातील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो.
सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत या मंदिरात भक्तांची गर्दी उसळलेली असते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, सर्वच मंदिरात सकाळी व सायंकाळी विधिवत पूजा करण्यात आली. भक्तांना दर्शनासाठी मंदिरे कुलूप लावून बंद करण्यात आली होती. परंतु, भाविकांनी महादेव मंदिरच्या पायरीवर डोके ठेवून दर्शन घेतले. एकंदरीतच यंदाचा महाशिवरात्री उत्सव हा भक्तांसाठी निराशाजनक ठरला.