श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्याला वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा भासत आहे. दररोजच्या मागणीपेक्षा अत्यल्प पुरवठा असल्याने प्रशासनाला खासगी उद्योगांकडे असलेले सिलिंडर ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. शहरातील १३ खासगी कोरोना समर्पित उपचार केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. येथे एकूण २२१ बेड्सना ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था आहे. मात्र, त्यांना पुरेसा पुरवठा होत नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी दिवसभरासाठी सर्व रुग्णालयांनी १३४ सिलिंडरची मागणी प्रशासनाकडे केली होती. तुलनेत केवळ ८८ सिलिंडरचा त्यांना पुरवठा करता आला. याशिवाय खासगी उद्योग-व्यावसायिकांकडून १० ते १२ सिलिंडर प्रशासनाने ताब्यात घेतले, अशी माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.
रुग्णालय चालकांकडून ऑक्सिजनच्या मागणीकरिता प्रशासकीय कार्यालयातील फोन दिवसभर खणखणत आहेत.