श्रीगोंदा : येथील अग्निपंख फाउंडेशनने बेलवंडी (ता. श्रीगोंदा) ते सरडे (ता. फलटण) ९२ किलोमीटरची रविवारी सायकल वारी केली. टोकियो (जपान) मध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या प्रवीण जाधव यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना सलाम केला.
प्रवीण जाधव हा गावकुसाबाहेर घर असलेला एका गरीब कुटुंबातील खेळाडू आहे. तो अतिशय कठीण परिस्थितीवर मात करत ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला आहे. यातून प्रेरणेचे बीज तरुणाईत पेरले जावे या भावनेने सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दक्ष फाउंडेशनचे दत्ताजी जगताप, दादासाहेब घोडेकर, किसन वऱ्हाडे, प्रा. साळवे, सरडेचे माजी सरपंच रामदास शेंडगे यांनी शुभेच्छा दिल्या. या सायकल वारीचे लोणी व्यंकनाथ, काष्टी, गुंजखिळा (बारामती) येथे स्वागत करण्यात आले.
आष्टी येथील कृषिपुत्र अविनाश साबळे हा ऑलिम्पिकमध्ये ट्रीपल चेस तीन हजार मीटरमध्ये उतरला आहे. त्याला शुभेच्छा व अविनाशच्या माता-पित्याला वंदन करण्यासाठी बेलवंडी (श्रीगोंदा) ते आष्टी सायकल वारीचे शुक्रवारी (दि. ३०) आयोजन करण्यात आले.
---
कठोर परिस्थितीवर मात करून प्रवीण जाधवसारखे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी बाजी लावत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी हा अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
-ललिता बाबर,
आंतरराष्ट्रीय धावपटू
----
सहभागी सायकलपटू..
प्रेरणा सायकल वारीत ऋतुपर्ण साळवे, रोहित वऱ्हाडे, यशार्थ साळवे, कृष्णा साळवे हे शाळकरी मुले तसेच राजू साळवे, ज्ञानेश्वर हिवरकर, दादा घोडेकर, बाळासाहेब खामकर, कैलास हिरवेे, संदीप खलाटे, अण्णा खामकर, विलास इधाटे, बापू विशाल गव्हाणे, वाजे सकलेन शेख, दीपक कोद्रे, किशोर बिबे, कुमार लोखंडे, किशोर बिबे, ‘लोकमत’ श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे सहभागी झाले होते.
-----
२५ श्रीगोंदा सायकल
सरडे (ता.फलटण) येथील खेळाडू प्रवीण जाधव याच्या घरी श्रीगोंद्यातून गेलेले सायकलवीर.