पारनेर : हवामान आधारित पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शनिवारी जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेत शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने झालेल्या गोंधळात बँक अधिकारी कक्षाच्या काचा फुटल्या. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत सुरक्षारक्षक जखमी झाला. रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवली तरी शेतकऱ्यांच्या लांब रांगा होत्या.मुदतीचा कालावधी कमीराज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित पीकविमा योजना जाहीर केली आहे. पारनेर तालुक्यात मूग, बाजरी या पिकांना ही योजना लागू आहे. २६ जूनपासून पीकविमा हप्ता भरण्यास सुरवात झाली. याची मुदत तीस जूनपर्यंत आहे. रविवारी बँकेला सुट्टी असल्याने सोमवारी एकच दिवस गर्दी होईल म्हणून शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी जिल्हा सकाळपासुनच रांगा लावल्या होत्या.धक्काबुक्कीत जखमीसकाळी दहा वाजता बँक सुरू झाल्यानंतर गर्दी वाढत गेली. अधिकाऱ्यांनी शहर व मुख्य शाखेसह इतर ठिकाणी भरणा केंद्र सुरू केल्यानंतरही वाढत्या गर्दीला आवरता आले नाही. यामुळे शहर शाखेत गोंधळ उडाला. गोंधळात बँक अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या काचा फुटल्या तर गोंधळ सावरण्यासाठी गेलेले सुरक्षारक्षक रावसाहेब शिंदे धक्काबुक्कीत जखमी झाले. त्यानंतर पारनेर पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पुन्हा केंद्र सुरू करण्यात आली.यावेळी विकास अधिकारी बाळासाहेब दळवी, पांडुरंग खोडदे, संभाजी औटी, राजेंद्र पठारे, पत्रकार प्रमोद गोळे, राजेंद्र म्हस्के यांनी बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांच्याशी चर्चा झाली. बँक सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. बँकेचे अधिकारी आपल्यासाठी रात्रीपर्यंत काम करीत असून संयम राखावा, असे आवाहन पांडुरंग खोडदे यांनी केले. त्यानंतर गर्दीतील गोंधळ कमी झाला. या गर्दीने व वाहनांनी पारनेरमधील हिंद चौक व राळेगणसिध्दीकडे जाणारा रस्ता फुलुन गेला होता. पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी कालावधी कमी आहे. हा कालावधी वाढवून मिळावा, अशी मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)कर्जतमध्येही शेतकऱ्यांची झुंबडकर्जत : हवामानावर आधारित पीक विम्याचे पैसे बँकांनी स्वीकारण्यास सुरूवात केल्याने शेतकऱ्यांची बँकेत झुंबड उडाली आहे. यंदा पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पेरण्या केल्या. परंतु पाऊस गायब झाल्याने शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना हाती घेतली आहे. तसा अध्यादेश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना प्राप्त झाला आहे. या विम्याचे पैसे बँकेत भरण्याची अंतिम मुदत तीस जून आहे. परंतु विम्याचे पैसे भरण्यास बँक तयार नसल्याने युवक काँग्रेस अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी संबंधित बँकांना आदेश दिले. बँकेत पीक विमा योजनेचे फॉर्म स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)रात्री बारापर्यंत मुदतपीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या पारनेर तालुक्यातील सर्व शाखांच्या रविवारच्या सुट्ट्या रद्द केल्या असून रविवार व सोमवारी बँक फक्त पीकविमा हप्ता भरण्यासाठी रात्री बारा पर्यंत सुरू राहतील. उदय शेळके, उपाध्यक्ष जिल्हा बँकतलाठी उपलब्ध होणारसातबारा उताऱ्यासाठी रविवार व सोमवारी अडचण येऊ नये म्हणून तलाठ्यांना दोन दिवस गावातच थांबण्याची मागणी तहसीलदारांकडे होती. त्यानुसार तलाठ्यांना गावातच दोन दिवस थांबून सातबारा देण्याविषयी सुचना केल्या आहेत.राहुल शिंदे,अध्यक्ष, अण्णा हजारे युवा मंच
धक्काबुक्की,काचा फुटल्या
By admin | Updated: June 29, 2014 00:28 IST