शेवगाव : राज्य सरकारने सोमवारपासून (दि.७) सर्व आस्थापना उघडण्यास मुभा दिली. त्यामुळे तब्बल ५४ दिवसांनंतर शेवगाव शहरातील सर्व दुकाने उघडली, त्यामुळे बाजारपेठ फुलली. बऱ्याच दिवसांनी दुकानाचे कुलूप उघडताना व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. खासगी व शासकीय कार्यालयात अभ्यागतांची वर्दळ दिसून आली, तर बसस्थानक परिसरात तुरळक नागरिक दिसून आले. घराबाहेर पडलेले नागरिक कोरोनाबाबतचे नियम पाळताना दिसून आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने १४ एप्रिलपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, कोरोना बाधितांच्या वाढलेल्या रुग्णसंख्येने प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे एरवी गर्दीची ठिकाणे निर्मनुष्य झाली होती. जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्याने आरोग्य, महसूल, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. आरोग्य यंत्रणेवरील वाढलेला ताण काहीसा हलका झाला. रुग्णसंख्येत घट होताच सरकारने सोमवारपासून (दि.७) सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली.
सोमवारी सकाळीच व्यापारी, दुकानदारांनी आपआपली दुकाने उघडली. तब्बल ५४ दिवसांनंतर दुकानाचे कुलूप उघडताना दैनंदिन रोजी-रोटी देणारा व्यवसाय सुरळीत होणार, या आशेने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी वावरणारे नागरिक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना दिसले. तोंडाला मास्क बांधून वावरताना नागरिक दिसून येत होते. अनलॉकनंतरचा पहिलाच दिवस असल्याने पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी पथकासह बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेताना नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या.
-------
एरवी एक-दोन दिवस दुकाने बंद असली तरी आर्थिक फटका बसतो. या आपत्ती काळात बरेच दिवस दुकान बंद ठेवावे लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुकान बंद असले तरी वीज बिल, कर्जाचा हप्ता, कामगारांचा पगार हा खर्च थांबला नव्हता. कोरोना काळात सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेत कडकडीत बंद ठेवून सरकारला साथ दिली. सरकारने व्यापाऱ्यांची भूमिका समजून घेत आयकरसह विविध बाबतीत व्यापाऱ्यांना काही प्रमाणात सूट द्यायला हवी.
-संजय गुजर,
दुकानदार, शेवगाव.
--------
बरेच दिवस दुकान बंद होते. व्यवसाय थांबला असला तरी खर्च थांबला नव्हता. दुकान बंद असल्याने मोठ्या प्रमाणात मालावर धूळ साचून नुकसान झाले आहे. दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली याचा आनंद आहे; मात्र ग्राहकांनी कोरोना गेला, असे समजून सकाळच्या सत्रात खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये.
-राजेंद्र मेहेर,
शालेय साहित्य होलसेल विक्रेता.
----
फोटो आहेत..
०७ शेवगाव बाजार, १,२,३
‘ब्रेक द चेन’चे निर्बंध शिथिल होताच शेवगाव शहरात सोमवारी सकाळी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. दुकानाच्या शटरचे कुलूप उघडताना एक दुकानदार. दुसऱ्या छायाचित्रातील दुकानदार पुन्हा नको, असे संकट तर पमेश्वराला म्हणत नसेल ना! तिसऱ्या छायाचित्रात तोंडाला मास्क लावून बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असलेले नागरिक. (छायाचित्र : अनिल साठे)