अहमदनगर : दृष्ट प्रवृत्तींचा नाश आणि नावीन्याची निर्मिती ही संकल्पना अधोरेखित करणारा विजयादशमी हा सण घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर ‘मुहूर्ताची खरेदी’ ही परंपरा आजही आवर्जून संभाळली जाते़ सध्या बाजारपेठेत सोने-चांदीचे दागिने, कपडे, दुचाकी, चारचाकी वाहने व घरगुती वापरांच्या वस्तुंची मोठी खरेदी होत आहे़ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा ग्राहकांच्या सेवेसाठी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सज्ज झाल्या असून, या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे़ बाजारपेठेत सर्वात जास्त उलाढाल ही सोने-चांदी, दुचाकी-चारचाकी आणि घर खरेदीवर झाली आहे़ साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीचा घटस्थापनेपासून शुभारंभ होतो़ या दिवसापासून नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा जोपासली जाते़ त्यामुळे गेल्या सहा ते सात दिवसांपासून कपड्यांची दुकाने, ज्वेलर्स, फर्निचर, मोबाईल , इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी दुकानांत ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे़ ग्राहकांच्या खरेदीचा कल लक्षात घेवून बाजारपेठेत विविध स्कीम देवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे़ काही प्रमाणात खरेदीवर सूट मिळवून चांगल्या वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचाही या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे़ दसऱ्यानिमित्त थेट कंपनीकडूनच प्रत्येक वस्तुवर विशेष सूट आणि नवनवीन व्हारायटीज उपलब्ध करून देण्यात आल्याने ही खरेदी ग्राहकांसाठी पर्वणीच ठरते़ दिवाळीच्या खरेदीचा दसऱ्यापासून शुभारंभ होतो़ यामध्ये महिला वर्गांची तर मोठी सुवर्णखरेदी असते़ सोन्याच्या दुकानांमध्ये दसऱ्यानिमित्त आधीच चार ते पाच महिने, सुवर्णभिशी व सुवर्ण लोन योजना सुरू करण्यात येतात़ दसऱ्याच्या मुहूर्तावर रिअलइस्टेट व्यवसायात तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ शहरात व उपनगरात विविध बांधकाम व्यावसायिकांच्या साईटस् बांधून पूर्ण झाल्या असून, दसऱ्यानिमित्त घर बुकिंगसाठी विशेष स्कीम देण्यात आल्या आहेत़ अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाचे घर खरेदीचे नियोजन असते़ मात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर घर बुक केले जाते़ घर खरेदीचा मुहूर्तदसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक जण घराचे बुकिंग करतात़ त्यामुळे या काळात बांधकाम व्यावसायिकांकडून विविध योजना राबविण्यात येतात़ बुकिंगमध्ये विशेष सवलतीमुळे ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो़ नगर शहरात दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो़ यावेळीही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे़ - मकरंद कुलकर्णी, मार्क कन्स्ट्रक्शन्स.सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना लाभगेल्या एक महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावरच सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांसाठी पर्वणी ठरली आहे़ दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होते़ त्यामुळे अनेक ग्राहक दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने व चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात़ शहरातील अनेक सराफांनी जितके सोने खरेदी करणार तितकी चांदी मोफत देण्याची स्किम दिल्याने ग्राहकांची सध्या सोन्याच्या बाजारात गर्दी होत आहे़ - एस़बुऱ्हाडे सराफ
विजयादशमीच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीचा महोत्सव
By admin | Updated: October 2, 2014 00:34 IST