शिर्डी : येथे गुरूवारी दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला़ यात दोघांनी आत्महत्या केली, तर एका तरुणाचा निर्घृण खून झाला. अवघा एकवीस वर्षाचा राहुल शेषराव तुपे (रा. रांजणगाव, शेनपुंजी, औरंगाबाद) व कल्पना कवट (वय ३८, रा. वसई ) या दोघांनी बुधवारी शिर्डी येथील हॉटेल श्रीकृष्णामध्ये पंख्याला वेगवेगळ्या ओढणीने एकत्रित गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली़कल्पना वसईतून, तर राहुल रांजणगाव शेणपुजी येथून गेल्या २ मे पासून बेपत्ता होते़ त्यांच्या नातलगांनी ते हरवल्याची तक्रारही स्थानिक पोलिसात दाखल केलेली होती़ मंगळवारी सायंकाळी हे दोघे येथील श्रीकृष्णा हॉटेलमध्ये रूम नंबर १०८ मध्ये उतरले होते़मध्यरात्रीनंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे़ सकाळी हॉटेल कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांना कळवण्यात आले़ यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक राक्षे, दिलीप मंडलीक, मनोज सनानसे, सुभाष थोरात, भराट आदीनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली़ राहुल अविवाहित असून मालेगाव येथे शिक्षण घेत होता, असे त्याच्या नातलगांकडून सांगण्यात आले़ मात्र या दोघांची ओळख कशी झाली? त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप उलगडा होवू शकला नाही़ हेड कॉन्स्टेबल दिलीप मंडलीक घटनेचा तपास करीत आहेत़दुसऱ्या घटनेत गुरुवारी पहाटे संस्थानच्या द्वारावती इमारती समोरील बागेलगत असलेल्या मैदानात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाला आहे़ मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राक्षे या घटनेचा तपास करत आहेत़ एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही घटनांनी शिर्डी हादरून गेली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
शिर्डीत दोन घटनांत तिघांचा मृत्यू
By admin | Updated: May 6, 2016 18:41 IST