अहमदनगर : गुरूपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीत भाविकांची येणारी संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेसह रस्ते, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचे योग्य नियोजन करावे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.गुरूपौर्णिमेच्या उत्सवाची तयारी शिर्डीत सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार दळवी, पोलीस उपाधीक्षक विवेक पाटील, संपतराव भोसले, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, गटविकास अधिकारी कमलाकर रणदिवे, कैलास कोते, राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र राहाणे उपस्थित होते.उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी संस्थानने केलेल्या उत्सवाच्या तयारीची माहिती यावेळी दिली. विखे यांनी बैठकीत प्रामुख्याने शिर्डीतील कायदा सुव्यवस्थेचे मोठे आव्हान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. उत्सवाच्या काळात जादा बंदोबस्त शिर्डीत बोलवावा तसेच संस्थानच्या परिसरात स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक उत्सव काळात करावी. भाविकांच्या माहितीसाठी इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिनही भाषेत सूचनांचे फलक लावावेत अशी सूचना त्यांनी केली. शिर्डीत पाकिटमारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला असला तरी पाकीटमार हे अल्पवयीन असल्याने ठोस कारवाई करता येत नाही. अशी माहिती बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अल्पवयीन पाकिटमारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पाकिटमारांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करावा, असे आवाहनही विखे यांनी केले. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन दारणा धरणातून स्वतंत्र आवर्तन सोडणे गरजेचे असल्याचे मत विखे यांनी मांडले. नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतूक कोल्हार-लोणी- तळेगाव या रस्त्यावरून वळविणार असल्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
शिर्डीसाठी दारणातून आवर्तन आवश्यक
By admin | Updated: July 5, 2014 00:30 IST