शेवगाव : वृक्ष लागवड करुन संवर्धनासंबंधी मोठ्या प्रमाणात शासनस्तरावरुन जनजागृती सुरु असताना वनविभाग व अन्य संबंधित खात्यांची कोणतीही परवानगी न घेता शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बहारलेल्या झाडांची कत्तल केली आहे. याबाबत संस्थेचे संचालक मंडळ अनभिज्ञ आहे.
याबाबतची संचालकांना काहीच माहिती नसून सभापती म्हणतात, ते तर दहा ते बारा बाभळीची झाडे होती.
सदरची झाडे तोडताना लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार होती. परंतू झाडे घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्यातील वैयक्तिक वादामुळे, वाद टाळण्यासाठी लिलाव करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र बोलावून सर्वाधिक रक्कम एक लाख पाच हजार रुपये देणाऱ्याला ती झाडे देण्यात आल्याचे सभापती अनिल मडके यांनी सांगितले.
वास्तविक याप्रकरणी जिल्हा सहाय्यक उपनिबंधकांची तसेच वन विभागाची परवानगी घेणे व लिलाव प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना कोणाच्या हितासाठी वृक्षतोड करण्यात आली याचे अद्यापही गौडबंगाल आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधीतावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. वृक्षतोड करताना वन विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे वनपाल पांडुरंग वेताळ यांनी भ्रमणध्वनीवरुन सांगितले.
बाजार समितीच्या १६ एकर आवारात जनावरांचा आठवडे बाजार भरतो. त्या ठिकाणी अनेक वर्षापासून मोठाले वृक्ष होते. बाजार अथवा इतर दिवशी या वृक्षांच्या सावलीत शेतकरी बसून सावलीत घरुन आणलेल्या भाकरीने भूक भागवीत होता. पंरतू गतवर्षी जुलै महिन्यात बाभूळ, लिंब, वड अशा वृक्षांची कत्तल करण्यात आली. सदर झाडे तोडताना वनविभाग, जिल्हा सहाय्यक निबंधक यांची परवानगी घेतली गेली नाही. इतकेच काय बाजार समिती विषय पत्रिकेवर हा विषय घेतलेला नाही. झाडे तोडण्याचा जाहीर लिलाव होणे गरजेचे होते. त्याचे चित्रिकरणही करण्यात आले नाही. संचालक मंडळाला याची माहिती मिळाली परंतू ते ही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील महिन्यात संचालक मंडळाच्या झालेल्या मासिक सभेत वृक्षतोडीवर खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.
.....
कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यानचा विषय असल्याने याबाबत मला जास्त माहिती नाही.
-रामनाथ राजपुरे, संचालक, बाजार समिती, शेवगाव.