बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत
By admin | Updated: April 27, 2017 18:38 IST
बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेदरम्यान शिराळ (ता. पाथर्डी) व घारगाव (ता. संगमनेर) येथे बिबट्यांनी हल्ला करुन शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला.
बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत
लोकमत आॅनलाईनअहमदनगर : बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेदरम्यान शिराळ (ता. पाथर्डी) व घारगाव (ता. संगमनेर) येथे बिबट्यांनी हल्ला करुन शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला. तर करंजीच्या डोंगरात दोन मोर मृतावस्थेत सापडले. शिराळ येथे कडगाव रस्त्यावरील तुकाराम मुळे यांच्या वस्तीवरील शेळ्या, मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन मेंढ्या दगावल्या. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शिराळ परिसरात घबराटीचे वातावरण आहे. वृद्धेश्वर- करंजी, करंजी -शिराळ- चिचोंडी -पांढरी पुलापर्यंत गर्भगिरी डोंगराच्या रांगा आहेत. जंगलातील पशु - पक्षांसाठी वनविभागातर्फे पाणवठे तयार करण्यात आले. परंतु वन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे यावर्षी हे पाणवठे भरलेच नाहीत. कडक उन्हाळ्यामुळे डोंगरात कोठेही पाणी नसल्याने या भागातील प्राणी मानवी वस्त्यांवर हल्ले करु लागले आहेत. शिराळ येथील तुकाराम मुळे बुधवारी रात्री शेतात ६० शेळया- मेंढ्यांसह झोपले होते. रात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये तीन मेंढ्यांचा मृत्यू झाला. वनकर्मचारी मुबारक पठाण, मोहन पालवे यांनी घटनेचा पंचनामा केला. या भागात राहणारे महेश चेमटे गुरूवारी सकाळी शेतात जात असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. वृध्देश्वर, लोहसर, करंजी, शिराळ चिचोंडी या भागातील डोंगरात विविध पशू - पक्षी आहेत. वृध्देश्वर व करंजीच्या घाटात मोठया प्रमाणावर मोर आहेत. यंदा कडक उन्हामुळे डोंगरात पाणी राहिले नाही. पाण्यावाचून पशू, पक्षांचे हाल होत आहेत. मागील आठवड्यात वृध्देश्वर व करंजीच्या डोंगरात दोन मोर मृतावस्थेत आढळले. घारगाव (ता संगमनेर) येथे घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्यांनी हल्ला करून दोन शेळ्यांसह बोकड्याचा फडशा पाडला. घारगाव जवळील कुंरकुडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतानाच घारगावच्या आहेरमळा येथे मध्यरात्रीनंतर राहूल सुभाष आहेर यांच्या घराशेजारच्या गोठ्यात बिबट्यांनी अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरा ठार झाले. एक शेळी जखमी झाली. शेळ्यांच्या आवाजाने आहेर यांना जाग आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्यांनी धूम ठोकली. दोन बिबटे व बछडे असल्याचे त्यांनी यावेळी पाहिले. घारगाव वनपरिमंडळचे वनपाल बी.एस. काळे व वनरक्षक दिलीप बहिरट यांनी घटनेचा पंचनामा केला.